“ग्यानबाचे समाजशास्त्र”

मार्च 15, 2011

श्री.अनिल गोरे यांनी लिहीलेलेग्यानबाचे समाजशास्त्रपुस्तक आपल्याला उपलब्ध करुन देत आहे.

या पुस्तकात खालिल प्रकरणे असतील:

प्रस्तावना
१. आमच्यात असं असतं
२. आहार संस्कृती
३. शब्द हाचि देव
४. सण आणि संस्कार
५. लेकुरे उदंड जाहली
६. घर असावे घरासारखे
७. जाता जात नाही ती जात
८. मोहेंजोदारो ते मुंबई
९. नवे महाभारत
१०. मानव आणि निसर्ग

लेखक परिचय

जन्म: १९४७ मॅट्रिक – पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी (बोर्डात क्रमांक चौथा)

B.Sc. १९६६ रुइया महाविद्यालय, मुंबई

M.Sc. १९६८ पुणे विद्यापीठ

Ph.D. १९७२ केंटकी विद्यापीठ, U.S.A.

नोकरी – मलेशिया, कॅनडा, अमेरिका, भारत.

संशोधन – संख्याशास्त्र आणि परिसरशास्त्र यांचा समन्वय

  • Fellow – Indian Academy of Science
  • Fellow – Nationala Institute of Ecology
  • Member – International Statistical Institute
  • Associate Editor – 1. Biometrics, 2. Journal of Agricultural Biology and
  • Ecological Statistics

Awards:

  • Distinguished Statistical Ecologist (International Ecological Congress, Italy
  • Best Applied Statistics Paper, Calcutta Statistical Association
  • 75 Research Papers, 2 Books

मराठी लिखाण:

वृत्तपत्रीय लेख – सकाळ, साप्ताहिक सकाळ, महारष्ट्र टाइम्स वगैरे (सुमारे ६०)

मराठी पुस्तके: १) नराचा नारायण, २) माकडचेष्टा

ग्यानबाचे समाजशास्त्र

प्रस्तावना

माणूस हा कळपाने रहाणारा प्राणी आहे. माणसांच्या कळपाला समाज म्हणतात. या कळपातील माणसे तर्‍हेतर्‍हेच्या धाग्यानी एकमेकाशी जोडलेली, बांधलेली, जखड्लेली असतात. कळपाने, सामुहिक जीवन जगताना माणसे कशी वागतात हे निरखून बघणे म्हणजेच माणसाचा सांस्कृतिक, सामाजिक अभ्यास. आपण त्या संदर्भातील नियमांचा शोध घेऊ लागलो की अभ्यासाचे होते शास्त्र. समाजरचनेचे, मानव संस्कृतीच्या विकासाचे असे काही नियम असतात का? असले तर ते स्थलकाल सापेक्ष असतात की निरपवाद आणि सार्वत्रिक? मुळात समाज घडला कधी? कसा? आणि का? या आणि अशा काही प्रश्नांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे. माझा अपेक्षित वाचक कोण? तर गमतीचे, मौज-मजेचे, हलके-फुलके वाचन पुरेसे झाल्यावर किंचित जास्त वजनदार वाचण्याची हौस उरलेला प्रौढ मराठी माणूस. एखाद्या विद्यापीठीय अभ्यासक्रमासाठी हे पुस्तक कोणाला उपयुक्त वाटले तर तो एक योगायोगच म्हणावा लागेल.

हे पुस्तक गंभीर विषयावर आहे. पण त्याचे लिखाण सोपे व सुलभ ठेवण्याचा प्रयत्न मी केला आहे. यात समाजशास्त्रीय परिभाषा अशी नाही. रोजच्या व्यवहरातील शब्दच बहुतेक ठिकाणी वापरले आहेत. समाजशास्त्राचा रुढ चाकोरीतून अभ्यास केलेला नसल्यामुळे मला मुद्दलात अशी Jargon फारशी माहीतच नाही. म्हणून ती टाळण्यासाठी खास प्रयत्न करावा लागला नाही.

सुरुवातीला जरी मी साऱ्या जगाला गवसणी घालण्याचा आव आणला असला तरी हे पुस्तक मुख्यत: मराठी माणसांबद्दल आहे. याचे कारण म्हणजे माझा मुळात थोडका असलेला अनुभव हा बराचसा मराठी समाजाच्या संदर्भात आहे. जगोजागी मी इतर प्रांत वा देश यांची उदाहरणे वापरली आहेत. पण मुख्य रोख मराठमोळा.

माझ्यासारखा संख्याशास्त्राचा शिक्षक या भलत्याच विषयाकडे वळतो तरी कशाला? एकत सुजाण माणसाना आपण ज्या समाजाचा भाग आहोत त्याचे अंतरंग समजावून घेण्याची उत्सुकता असतेच. शिवाय कॉलेजमधे शिकत असताना मी युक्रांद अर्थात क्रांती दल या संघटनेत होतो. त्यावेळी कुमार सप्तर्षी, अनिल अवचट यांच्यासारखे विद्यार्थी मित्र, पु.ग. सहस्त्रबुध्दे, श्रीराम चिंचलीकर, राम बापट यांच्यासारखे ज्येष्ट मार्गदर्शक अशांच्या सहवासातून वेगवेगळे संस्कार झाले. आजुबाजूला सामाजिक समस्यांची तर कमतरता नव्हतीच. ही जरा वेगळी पुर्वपीठिका. तिसरी आणि शेवटची बाब म्हणजे प्रसिध्द निसर्गशास्त्र माधव गाडगीळ यांचा सहवासात मी जीवशास्त्राच्या आणि विशेषत: परिसर अभ्यासाच्या माध्यमातून समाजाकडे बघायला शिकलो. माझ्या असे लक्षात आले की हा पैलू अनेकाना नवीन असतो. म्हणून केलेले वाचन + ऐकलेल्या गप्पा + घेतलेले अनुभव अशी खिचडी पकवण्याचा घाट घातला. बिरबलाच्या खिचडीप्रमाणे या प्रकल्पाला मूर्त रुप येण्याला चांगली १०-१२ वर्षे लागली. अर्थात या लिखाणाची वाट पहात कोणीच अवघडले न्हवते.

जीवशास्त्रीय दृष्टिकोन समजावून घेताना मी दोन पुस्तके लिहिली. माझ्या प्रौढ शिक्षणाचे हे टप्पे. पहिले पुस्तक ‘नराचा नारायण’. जीवशास्त्राचा जो पायाभूत सिध्दांत उत्क्रांतिवाद त्याची ओळख या पुस्तकात आहे. दुसरे पुस्तक ‘माकड चेष्टा’. त्यात प्राण्यांचे स्वभाव कसे असतात व का या प्रश्नांचे उत्क्रांतीवादाच्या आधाराने वर्णन केले आहे. तिसरी आणि अखेरची पायरी म्हणजे मानवी समाज आणि संस्कृती यांचे रुप समजावून घेणे ही प्रस्तुत पुस्तकात आकरली आहे.

थांबा. निराश होऊ नका. हे तिसरे पुस्तक वाचण्यासाठी आधीची दोन पुस्तके वाचलेली असण्याची गरज नाही. माझा प्रवास कसा झाला हे कळण्यासाठी किंवा जास्त वाचन करु इच्छिणारांसाठी तो उल्लेख आहे. हे, तुमच्या हातातील, पुस्तक देखील सरल रेषेत सुरवतीपासून शेवटापर्यंत वाचण्याची गरज नाही. ज्याचा शीर्षकाबद्दल कुतुहल वाटेल ते प्रकरण तडक वाचावे. तरी चालू शकेल.

पुस्तकाच्या नावाबद्दल सांगितले पाहिजे. हल्ली ‘अमुक तमुक for dummies’ अशा शीर्षकाची फॅशन आहे. ‘अडाण्यासाठी संगणकविद्या’ असे नाव शोभून जाते. कारण थोड्या वर्षांपूर्वी हा विषयच अस्तित्वात न्हवता. त्यामुळे बहुतांश लोक या संदर्भात अडाणी असतीलही. उलट या पुस्तकातील विषय कोणालाच नवीन नाहीत. किंबहुना ‘याबद्दल लेखक आणखी वेगळे काय सांगणार बुवा?’ असेच अनेकाना वाटेल. वाचक लेखकाइतकाच जाणकार असल्यावर नवलाई कशाची असणार तर काही तपशील, मांडणीची रीत, संकल्पनेची चौकट इत्यादि. यापलीकडे काही विशेष, संशोधकानासुध्दा नवे असे सांगितल्याचा माझा दावा नाही. नावाचे दुसरे प्रयोजन म्हणजे अर्धशतकापूर्वी कै. न.वि. गाडगीळ यांनी लिहिलेल्या ‘ग्यानबाचे अर्थशास्त्र’ या पुस्तकाच्या शीर्षकाचे अनुकरण. ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी हा महाराष्ट्रातील एक चमत्कार आहे. तत्वज्ञानासारख्या अवजड विषयावर लिहिलेला हा ग्रंथ गेली सातशे वर्षे पिढ्यानपिढ्या जनसामान्यांच्या व्यक्तिगत व सामुदायिक वाचनात आहे. आणि या ब्राम्हण तरुण पंडिताचे नाव बहुजन समाजात मायेने आणि प्रेमाने अपभ्रंशरुपात मुलाना ठेवले जाते. रुढार्थाने एखाद्या विषयात शिक्षित असो वा नसो, ग्यानबा हा शहाणा माणूस आहे. त्याच्यासाठी मैत्रभावाने आणि आदराने ही रचना केली आहे.

माझे लिखाण वाचून ते सुधारण्यासाठी अनेकानी सूचना केल्या. त्यात अनिल खर्शीकर, राजेंद्र व्होरा आणि नंदा खरे यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. उर्वरित चुकाना मीच जबाबदार आहे.

कै. न. वि. गाडगीळ यांची अर्पण पत्रिका पुढील प्रमाणे आहे. “शतकांपासून अज्ञानात, दारिद्र्यात व निराशेत असलेल्या बहुजन समाजाचा प्रतिनिधी ‘ग्यानबा’ यास हे लिखाण अर्पण केले आहे.”

आपली लेखनविषयक भूमिका सांगताना ते म्हणतात की ही सर्वसामान्य वाचकाना विशेषत: ज्याना इंग्रजी येत नाही त्यांच्यासाठी सोप्या भाषेत, सोप्या पध्दतीने केलेली अर्थशास्त्राची चर्चा आहे. तिच्यात काटेकोरपणा नसेल पण सुलभता खास आहे. कल्पना व विचार समजावून घेणे हेच या लिखाणाचे ध्येय आहे. ही धुळाक्षरे आहेत व तिही एका सामान्य व्यक्तीने काढलेली आहेत.

१९४१ साली घेतलेली ही भूमिका जवळपास पूर्णपणे माझ्या लिखाणालाही लागू आहे. गेल्या साठ वर्षात सामाजिक संदर्भ काहिसे बदलले आहेत. अज्ञान घटले आहे. साक्षरता वाढली आहे. संथगती का होईना पण गरिबी घटत आहे. कर्तूत्वाला अनेक दिशा मोकळ्या झाल्या आहेत. म्हणून आणि तेवढ्या मर्यादित अर्थाने निराशेची काळोखी कमी झाली आहे. पण ग्यानबासाठीच्या लिखाणाची गरज आजही तितकीच आहे.

या पुस्तकात जागोजागी पूर्वसूरींचे विचार उधृत केले आहेत. तसेच नाना तऱ्हेच्या माहितीची आणि तपशिलाची उसनवारी केलेली आहे. वैज्ञानिक संशोधपर लिखाणात याबाबत कमालीचा काटेकोरपणा असतो. सर्व संदर्भ शिस्तीने व अचुकपणे दिलेले असतात. माझ्या लिखाणात वाचकाला थोडा साळटाळपणा आढळेल याला काही अंशी आळस जबाबदार आहे. पण त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या वाचकाला संदर्भ, पुरावे या गोष्टी पूरक व पोषक म्हणून हव्या असतील. भातातला खडा दाताखाली यावा असा संदर्भ नको. म्हणून मी इतर लिखाणाचे अल्पस्वल्प टक्के मंडळीना उत्साह वाटलाच तर ‘पुढे काय वाचू?’ हा प्रश्न अनुत्तारित राहू नये एवढे त्यातून साधायचे आहे.

माझ्यापुरते विचाराल तर ते संदर्भ वाचणे हा मला फार मोठ्या आनंदाचा अनुभव ठरला. गुंतागुंतीच्या विषयाचा एखादा पैलू आपल्याला समजला ही भावना खूप समाधान देत. असे अधिकाधिक समाधान मूळ प्रयोजन होते. पुस्तक छापून आले, वाचकाना आवडले तर तो बोनस म्हणावा. आणि बोनसचा मोह कुणाला सुटला आहे?

शेवटी थोडक्यात विविध प्रकरणांबद्दल सांगतो. ‘आमच्यात असं असतं’ हे पहिले प्रकरण विषयप्रवेशाचे किंवा उपोद्घाताचे. मी अनेकदा बघतो की एखाद्या विषयात संशोधन करतात म्हणजे नेमके काय करतात याबद्दल लोकाना कुतुहल असते. इयत्ता पहिलीत मराठी विषय असतो तसा एम.ए. ला सुद्धा असतो. वरच्या पातळीवर नेमके काय वेगळे करतात? एकाऐवजी अनेक पुस्तके असतील. आणखी काय? या कुतुहलाची पूर्वता करण्याचा इथे प्रयत्न आहे. दुसरे प्रकरण आहाराबद्दल. आहार ही जीवांची मूलभूत क्रिया. अन्नपदार्थांचा इतिहास, स्वैपाकाचे प्रकार अशी या प्रकरणाची ‘रेसेपी’. पाकशास्त्र या विषयावरची पुस्तके मराठी माणसे सुध्दा आवर्जून विकत घेता म्हणून हे प्रकरण भाषेबद्दल. हा तर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. शिक्षणाचे माध्यम, भाषावार प्रांत, साहित्य संमेलने अशा विषयांवरचे गदारोळ आठवा. इथे अर्थात कल भाषाशास्त्र या विषयाकडे आहे. संस्कृती हा शब्द ऐकला की बहुतेकाना सुचतात ते सण आणि संस्कार. त्यांचा अर्थ आणि अन्वय लावण्याचा प्रयत्न चौथ्या प्रकरणात आहे लोकसंख्या, स्त्रियांचे प्रमाण, वृध्दांचे प्रमाण असे प्रश्न पाचव्या प्रकरणात येतात. कुटुंबसंख्या आणि त्याची रचना हा सहाव्या प्रकरणाचा आहे. त्यातच घर आणि त्याची रचना हा भागही आला आहे. भारताची सांस्कृतिक खासियत म्हणावी अशी चीज म्हणजे जात. जातिसंस्थेची चर्चा सातव्या प्रकरणात येते. खेडी आणि शहरे यांची उत्पती व विकास याबद्दल आठवे प्रकरण माहिती देते. भारतीय संस्कृतीचा आधुनिक अभ्यास करणारात इंग्रज शासक आघाडीवर होते. त्याशिवाय अलीकडेच देशी शासनयंत्रणेने भारतीय समाजाची एक महापहाणी केली. हिला जगात जोड नाही. यांची ओळख नवव्या प्रकरणात आहे. शेवटचे प्रकरण संस्कृतीचे निसर्गाशी असलेले घट्ट नाते उलगडून दाखवते.

आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक प्रकरण स्वतंत्ररीत्या वाचता यावे अशी कल्पना आहे. म्हणून काही ठिकाणी असलेली पुनरुक्ती तशीच राखली आहे. शिवाय महत्वाचा मुद्दा पुन्हा आला तरी बिघडत नाही.

वाचकांनी माझ्या चुका जरुर दाखवाव्यात. मी त्यांचा आभारी होईन.

टंक लेखकाविषयी:

मी -मिलीँद कोलटकर. 1990-93 चा पुणे विद्यापीठचा संख़्याशास्त्राचा आणि म्हणूनच प्रा. गोरेंचा विद्यार्थी. येथे marathi.wahchak at rediffmail dot com म्हणून वावरतो. टंकलेखनाच्या चुका जरुर दाख़वा. सुधारेन. आभारी असेन. दृष्य स्वरुपात आभार मानेन.

धन्यवाद!

<div id=”marblogwidget_1_10945″ class=”widget”><script src=”http://marathiblogs.net/trackback.js&#8221; type=”text/javascript”>
</script>
<a href=”http://marathiblogs.net”&gt;
<img  id=”marblogimg10945″ style=”margin: 10px;”
title=”The index of all Marathi blogs on the Internet”
src=”http://marathiblogs.net/marathiblogs/referral_ping/10945/5314d517a0d7e4ed&#8221; />
</a><script type=”text/javascript”>
_ident = “marblogwidget_1_10945”;
_img = “marblogimg10945”;
refTracker(_ident, _img);
</script></div>